Pages

http://picasion.com/gl/7Lbx/

सुस्वागतम तंत्रगुरू ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो

प्रेरणा एक सुवर्णपान या सदरात केलेले लेखन

🍂🎯🍂🎯🍂🎯🍂🎯

🔮 *प्रेरणा एक सुवर्णपान-6* 🔮

*स्वप्नं समृद्धतेचं - अरूण शिवाजी  पाटील लोहटार*
प्राथमिक शिक्षक  जि प शाळा बाळद ता पाचोरा जि जळगाव

*जगात अवघड किंवा अशक्य काहीच नाही फक्त असावी लागते ध्येय गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती,जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास आणि अविरत परिश्रम*

         कानाला हात पुरत नव्हता,आजी विनवणी करत होती पण गुरुजी माझे नाव शाळेत घालण्याच्या तयारीत नव्हते.आजी बळजबरीने हात कानाला लावत होती आणि दादा जन्मतारीख टिपलेली नाही पण सहावं सुरु आहे अस विनवित होती.कसेतरी नाव दाखल केले.खूप भीती वाटायची शाळेची आणि गुरुजींची.
      प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला तो घुले गुरुजींनी.त्यांना माझी घरची परिस्थिती पूर्ण ज्ञात होती.त्यांचा मुलगा किशोर माझा वर्गमित्र.गुरुजींचा मुलगा म्हणून त्याचे विशेष आकर्षण होतं.आम्ही सोबत अभ्यास करायचो.कधी त्याच्या घरी तर कधी माझ्या घरी.गणवेश पांढरा शर्ट आणि खाकी पँट.रात्री धुवायचा नि सकाळी वापरायचा.त्याची काही लाज नव्हती आणि कधी मी घरच्यांकडे कपड्यांच्या बाबतीत आग्रहही केला नाही आणि करायचा पण नाही.या बाहेरच्या गोष्टी आपल्या ध्येयाआड येऊ देऊ नये.दिवस निघत गेले.आमच्या प्राथमिक शाळेच्या शेजारी माध्यमिक विद्यालय तेथेच माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले आमचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पाटील सर.आम्ही त्यांना हेडसर म्हणत असू.ते शिस्तीने फारच कडक.आतून मात्र मवाळ.शाळा सुटल्यानंतर मुले अभ्यास करतात कि नाही ते पाहण्यासाठी ते गल्ली बोळातून फेर फटका मारायचे.असेच एक दिवस मी मित्रांसोबत गल्लीत गोट्या खेळत होतो.माझा नंबर असल्यामुळे मी गोटीवर नेम धरला.बसूनच होतो.मला फक्त टोलावयाची गोटी दिसत होती. इतका मी एकाग्र झालो होतो.तेवढ्यात आकाशात वीज चमकावी त्याप्रमाणे पाठीवर जोरात थाप पडली.दचकलो वर पाहतो तर हेडसर.बाजूला एकही मित्र नाही.त्यांनी मारले म्हणून मी कधी त्यांची आईवडिलांकडे तक्रार केली नाही.कारण मोठी माणसे केव्हाही आपल्या भल्यासाठीच शिक्षा करतात त्यांचा वाईट हेतू मुळीच नसतो.आपण सुद्धा त्यांच्याविषयी आपल्या मनात आकस ठेवायचा नाही.विटी दांडू,चोर पोलीस लंगडी,मांडोळी असे खेळ पण खेळायचो. *खेळ जीवनात सुदृढतेसाठी आवश्यक आहे.पण खेळाबरोबर आपण अभ्यासाला सुद्धा वेळ दिला पाहिजे.*शाळेत दर शनिवारी कवायत होत असे.कवायतमुळे जीवनात शिस्त लागते.पी.के.महाजन सर शाळेच्या गेट जवळ थांबायचे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा करायचे. *यशस्वी जीवन जगण्यासाठी जी शिस्त लागते ती मला माध्यमिक शाळेतच अंगवळणी पडली.*सर्वच गुरुजन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी झटायचे.आपण मात्र या वयात अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि अभ्यासाकडे पाठ फिरवतो.शाळेत पाच तास झाल्यानंतर जेवणाच्या सुटीत घरी आल्यानंतर घराला कुलूप.घरची सर्व मंडळी शेतात.ओट्यावर टोपलीच्या खाली भाजी भाकर झाकून ठेवलेली असे.शेजारी मित्राकडे जाऊन आम्ही सोबत जेवण करायचो.सोबत जेवण करताना आम्ही एकमेकांची भाजी भाकरी वाटून खायचो.त्यात पण मित्राप्रती प्रेम जिव्हाळा असतो. गणित विषय माझ्या आवडीचा विषय होता.गणित शिकवायला आम्हाला बी.पी.सोन्नी सर होते.त्यांचा मी आवडता विद्यार्थी.त्यांनी फळ्यावर उदाहरण लिहिल्याबरोबर मी लगेच उत्तर सांगायचो.यामुळे केव्हा केव्हा ते रागवायचे आणि सांगायचे “चूप आता दुसर्यांना सांगू दे” मला वाईट वाटायचे पण त्यांचा उद्देश स्पष्ट होता कि सर्वच मुले हुशार झाली पाहिजेत.सरांनी वापरलेले खडूंचे उरलेले तुकडे मी घरी आणायचो आणि दरवाजाच्या फळीवर शाळेत शिकवलेली उदाहरणे पुन्हा सोडवायचो.मला सरांसारखे खडूने लिहायला आवडायचे.तेव्हा मला गणित शिक्षक व्हावे असे वाटत होते.पण नुस्त वाटून चालत नाही.त्यासाठी अभ्यास पण करावा लागतो याची जाणीव होती.संस्कृत विषय नवीन होता पण श्री.एम.एस.पाटील सर सोप्या पद्धतीने शिकवत म्हणून काही अडचण नव्हती.त्यांच्याकडेच माझी इंग्रजी विषयाची शिकवणी.त्यांना गुड्डी नावाची मुलगी.फार हुशार.आम्हाला जेव्हा येत नसे तेव्हा ती चिमुकली गुड्डी उत्तर सांगत असे.आम्ही मात्र पाहतच रहायचो.आपल्यापेक्षा लहान मुलगी हुशार आहे मग आपण अभ्यास करायलाच पाहिजे असे आमच्या वाटायचे.
     आजीचे येणेजाणे सुरु असायचे तेव्हा ते सर सांगायचे बर का,“ताई,तुम्हना नातू तुम्हना काय पलटायी”.दिवाळीच्या सुटीत आम्ही सर्व भावंड रोजाने शेतात.आलेल्या मजुरीने कपडे लत्ते घेणे शाळेचा बाजार एवढेच व.परिस्थिती फार नाजूक.दहावीचे सेंटर तेव्हा भडगाव.परीक्षा जवळ आली आणि धाब्यावर लाईट घेण्याचे ठरवले पण आमचे स्वतःचे मीटर नव्हते.आम्ही शेजारच्या घरून काहीतरी  ४०-५० रुपये महिन्याने वायर जोडलेली होती.ते बाबा रात्री अंधार पडल्यावर सुरु करायचे आणि सकाळी उजाडल्यावर बंद करायचे.धाब्यावर लाईट घेण्यासाठी त्यांनी परीक्षा पुरती महिनाभर परवानगी दिली.त्याकाळी बहुतेक धाब्यांवर रात्री लाईट लाऊन मुले अभ्यास करायचे.आमच्यात स्पर्धा असायची कोणाचा लाईट लवकर बंद होणार नाही अशी.काही मुले गम्मत म्हणून १० – १५ मिनिटे बंद करायचे आणि पुन्हा चालू करायचे.मी मात्र सकाळी लवकर उठून अभ्यास करायचो.झोपेत आपल्याला शारीरिक आणि मानसिक आराम मिळतो आणि उठल्यावर ताजेतवाने वाटते.वाचलेले लगेच लक्षात राहते.परीक्षेसाठी पहिल्यांदाच फुल पॅंट शर्ट भेटले.परीक्षा दिली.निकाल लागला.फस्टक्लास मध्ये पास.पण पाहिजे तेवढे यश मिळाले नाही.त्याचे कारण असे होते,कि मी फक्त परीक्षेपुरताच अभ्यास केला होता.९० टक्के मुले अश्या चुका करतात म्हणून ते ९० किंवा त्यापेक्षा जास्त टक्के मिळवू शकत नाही.आपण नियमितपणे अगदी शाळा उघडल्यावर पहिल्याच दिवसापासून अभ्यास केला पाहिजे. *वेळचे काम वेळीच केले पाहिजे.तरच आपण आपले धेय गाठू शकू.* आपला अभ्यास रखडला तर तो वाढतच जातो आणि शेवटी आपण घाई गर्दीत तो पूर्ण करतो त्यामुळे आपल्याला आपली पात्रता असून देखील कमी गुण मिळतात.हे मात्र मी माझ्या अनुभवाने सांगतो.
           अकरावी सायन्स भडगाव ला अॅडमिशन.कॉलेज मध्ये सर्वात लहान म्हणून सर्वच चिडवायचे.त्याचे काही वाटायचे नाही पण सायन्स चे सर्वच विषय इंग्रजीत असल्यामुळे काही समजायचे नाही.नापास होण्याची भीती वाटू लागली पण का कोण जाणे कसा तरी काठावर पास झालो.त्याकाळी डी एड चा मार्ग गरीब आणि गरजू मुलांना खुणावत असे.मी पण तेच ठरवले.विचार केला जर आपण सायन्सच ठेवले तर बारावीला टक्के कमी पडतील मग डी एड ला नंबर कसा काय लागेल म्हणून मी साईड बदलवली आणि आर्ट्स घेतले.कॉलेज पण बदल . भडगाव ऐवजी पाचोरा.पाचोरा येथे एम एम कॉलेज ला मराठी साठी महालपुरे सर,इतिहास साठी चौधरी सर हे खर तर माझ्यासाठी टर्निंग पाॅइंट.यांनी मला फार प्रोत्साहित केले.आपले उत्तर चुकायला नको म्हणून मी तो धडा शिकवण्या आधी पण वाचून टाकायचो.त्यांच्या  तासिकेला ते फार प्रश्न विचारायचे आणि मी सुद्धा उत्तरे देण्यासाठी तयार असायचो.अशा पद्धतीने मी खूप अभ्यासाला लागलो.बारावीचा निकाल लागला पण इंग्रजी विषयात फक्तं ३५ गुण मिळाले म्हणून ६७ टक्के मिळाले.डी एड चा फॉर्म भरला पण दुर्दैवाने नंबर लागला नाही.आता माझ्यापुढे शिक्षण सोडायची वेळ आली कारण पास काढण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे.सुरत ला मामा होते तेथेच काहीतरी उद्योग करावा म्हणून आजी बरोबर सुरत गाठले.पण कामाला चित्त लागत नव्हते कारण शिकायची ओढ होती म्हणून आजीसोबतच घरी आलो.घरी सर्वाना मी सांगून टाकले,"मी काम करेल पण मला शिकू द्या".त्यांनी पण होकार दिला.
    तेरावीला कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.पण इंग्रजी विषयात १२ वीला पडलेले कमी गुण मला सलत होते म्हणून मी जिद्दीने स्पेशल इंग्रजी विषय घेतला आणि पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागलो. *जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही तेव्हा आपण तिच्याकडे जास्तीचे लक्ष दिले पाहिजे*.घरची मंडळी अडाणी असल्यामुळे त्यांना शिक्षणात रस नव्हता.सकाळचे कॉलेज झाल्यानंतर दुपारून आणि सुटीच्या दिवशी श्रीमंत अण्णांच्या म्हशी चारणे हा एकच उद्योग.कामाची कसली लाज.आलेल्या मजुरीतून पास काढणे आणि वह्या,पुस्तके घेणे एवढेच.बघता बघता तेरावी झाली पण आकर्षण मात्र डी एड चे होते.पुन्हा मोठ्या आशेने डी एड साठी फॉर्म भरले यावेळी नुसतं जळगाव लाच नाही तर मुंबई, ठाणे,रायगड,रत्नागिरी असे दूर दूर फॉर्म भरून ठेवले.एकदा अपयश आले म्हणून आपण खचायला नको.पुन्हा आपण प्रयत्न करायला पाहिजे.आपण प्रयत्न करण्याच्या आधीच म्हणतो मला यश मिळणार नाही.अरे पण प्रयत्न करणे तर आपल्या हातात असते ना.पुढचा विचार करायचा नाही यश आपोआप धावत येते.आपण मात्र सकारात्मक असले पाहिजे.उन्हाळ्याच्या सुटीत खत पसरवण्यासाठी गल्लीतील मोहन अण्णांच्या शेतावर रोजाने गेलो होतो.दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा आईने आलेले पाकीट दाखवले.ते वाचले तर काय चक्क डी एड चा कॉल.भरणा डी एड कॉलेज जिल्हा रत्नागिरी. *मित्रांनो,परिस्थितीचा बाऊ करू नका,परिस्थिती आपल्या ध्येयाआड येतचं नाही.फक्त आपल्यात तिला सामोरं जाण्याची शक्ती असावी.*
       आनंदाला कुठलीच सीमा उरली नाही.मोहन अण्णांकडून मजुरी सोबत जास्तीचे पैसे घेतले आणि निघालो एकटाच.दादर हून रत्नागिरी बस पकडली रात्री १० ची . भर पावसात तुफान वेगाने बस जात होती.एकटा असल्यामुळे भीती पण वाटत होती.मनात मात्र डी एड चे ध्येय होते. *ध्येय माणसाला खंबीर बनवते*.सुकिवली या ठिकाणी मी उतरलो.तेथे माझे काका कामाला आले होते.सर्व कोकण माझ्यासाठी नवीन होते.रिक्षाचालक मला घेऊन गेला. काकांनी माझा आवाज ऐकला आणि बाहेर आले.काकांनी कॉल वाचला ते म्हणाले,"आराम कर तू प्रवासात दमून आलाय".अॅडमिशन घेण्यासाठी रत्नागिरीला जावे लागणार होते पण काकांना वाटले कि आज शासकीय सुटी असल्यामुळे अॅडमिशन होणार नाही म्हणून निवांत होतो,पण शंका नको म्हणून उशिरा का होईना रत्नगिरी कॉलेज गाठले.बघतो तर काय  अॅडमिशन प्रक्रिया सुरु.चौकशी केली सरांनी माझ्या हातातला कॉल वाचला आणि शांत पणे म्हणाले “बेटा तुला ११ वाजता बोलावले होते आता २ वाजले तुझी संधी चुकली आता तुझे अॅडमिशन आम्ही वेटिंग ला दिले”.असे ऐकल्याबरोबर मन सुन्न झाले,पायाखालची जमीन हादरली आणि आभाळ कोसळले.माझ्या जीवनात आता काही शिल्लक नाही असे वाटले.कसे असते बघा मला संधी चालून आलेली होती पण मी वेळेशी प्रामाणिक राहिलो नाही त्यामुळे माझ्यावर असा प्रसंग आला.चुकलेली वेळ मला चांगलाच धडा देऊन गेली.आपण एखाद्याने दिलेली वेळ पाळलीच पाहिजे म्हणजे ती सवय आपल्या अंगवळणी पडते.तेथून जड पावलांनी पुन्हा सुकिवली ला परत आलो.गावी वाणीच्या दुकानावर फोन लावला पण लागला नाही कारण पाऊस जोरदार बरसत होता.रात्री जेवलो नाही.रात्रभर झोप लागली नाही.दुसऱ्या दिवशी पुन्हा एस टी डी बूथ वर गेलो फोन लावला लागला नाही.अर्धा तास प्रयत्न केला तरी नाही.तिसऱ्या दिवशी गावी परत यायला निघालो फोन लावायचा नव्हता पण मनात आले लाऊन तर पाहू.डायल करताच फोन लागला.तिकडून मित्र बोलला कि तुला मुंबईचा पण कॉल आला आहे.त्याने मला फोन वर अॅडमिशन चे ठिकाण आणि वेळ सांगितली.आनंदाला सीमा उरली नाही.चला,जो होता है अच्छे के लिये होता है.देवाने एक दरवाजा बंद केला आणि दुसरा उघडला.आता मात्र ठरलेली वेळ पाळायची म्हणून त्या क्षणाला निघालो.परेल,मुंबई १२ येथे के एम एस कॉलेज मिळाले.अॅडमिशन झाले आणि आनंदाने पठाणकोट एक्सप्रेस ने गावी आलो.झालेली हकीकत कोणालाच सांगितली नाही.घरी मात्र संकट पडले ते याकारणाने कि दोन वर्ष खर्च कसा करायचा आपल्याला आजची चिंता आहे.वडिलांनी आणि गावातल्या काही शिक्षण प्रेमी लोकांनी आजीला समजावले आणि माझे डी एड चे स्वप्न पूर्ण झाले.परेल या ठिकाणी खूपच खडतर दिवस काढले.कधी कधी वडापाव आणि सँडवीच वर भागवले.ते दिवस खूप जीवनोपयोगी गोष्टी देऊन गेले.
      जीवनात आदर्श,विद्यार्थी प्रिय,एकनिष्ठ,कार्य तत्पर शिक्षक होण्याचे ठरवले होते.आज प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे.देशाचं भविष्य घडवित आहे.प्रामाणिकपणे व्यवसायाला न्याय देतोय.आज ग्रामीण भागात शिकवायला मला खूप आनंद वाटत आहे.विद्यार्थी माझे दैवत आहेत त्यांच्यात दिवस कसा जातो समजत नाही.विद्यार्थी समजून घेणं खूप जिकरीचं.पण खूप शिकायला मिळतंय त्यांच्याकडून.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवितांना अभिमानास्पद वाटते.मला गायन फार आवडते.सध्या शास्त्रीय संगीत शिकत आहे.वेळ मिळेल तेव्हा तासन तास रियाज आणि विद्यार्थी सेवा बस्स.मला स्वतःच आणि देशाच भविष्य ज्यांच्या हाती आहे त्यांना असे सांगावेसे वाटते कि ...
*सध्या स्पर्धेच युग आहे म्हणून मला नोकरी लागणार नाही असा नकारार्थी विचार करू नये.आपण अथक परिश्रम केले तर आपण नक्की यशस्वी होतो.जीवनात जो कोणी बनायचं आहे तो आपण सर्वोत्तम बनले पाहिजे.आपण अगदी जरी सफाई कामगार बनलो तरी त्यात आपण सर्वोत्तम असले  पाहिजे.गावात १० सफाई कामगार असले तरी एखाद्याने मला अमुक नावाचाच सफाई कामवाला पाहिजे असे म्हटले पाहिजे त्याला म्हणतात सर्वोत्तम व्यक्ती,मग स्पर्धा कितीही असू द्या.आपल्याला नो प्रॉब्लेम.अगदी भारतरत्न सचिन तेंडूलकरचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा,आदर्श घ्या.आचरेकर सर जेव्हा सचिनला बॉलिंगचे धडे द्यायचे तेव्हा मैदानात एकच स्टंप असायचा आणि त्यावर एक २ रुपयाचे नाणे असायचे.सर त्याला सांगायचे कि स्टंप उडव आणि त्यावरचे नाणे खाली पडले कि समोरच्या गाडीवर जाऊन वडापाव खाऊन घे.सचिनला भूक लागायची कारण तो तासनतास सराव करायचा.सचिनला बॉलिंग करताना फक्त तो स्टंप दिसायचा आणि तो हिट करायचा याला म्हणतात एकाग्रता आपण अभ्यासात कामात अशी एकाग्रता दाखविली तर आपण नक्की यशस्वी होऊ.सचिन जेव्हा शतक करायचा तेव्हा तो आकाशाकडे पाहायचा आणि वडिलांना उद्देशून म्हणायचा कि हे शतक केवळ आपल्या आशीर्वादामुळे झाले.कमालीची नम्रता त्याच्याकडे होती.आपण सर्वोच्च शिखर जरी गाठले तरी आपण मोठ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली  पाहिजे.जीवनातील प्रत्येक तासातील प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक मिनिटामधील  प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करायला शिका.एक सांगतो,कोणतही काम करण्यासाठी टेक्निक वापरा प्रत्येक क्षेत्रात त्याची गरज असते.नियमितपणे प्राणायाम योगासने करा अभ्यासाची क्षमता वाढते स्मरणशक्तीचा विकास होतो.*

चला तर मग आत्ताच ध्येय ठरवा आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग करा.

*अरुण शिवाजी पाटील*
*प्राथमिक शिक्षक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळद*
*ता.पाचोरा जि.जळगाव*




No comments:

Post a Comment